
मुंबई (न्युज महाराष्ट्र लाईव्ह):-
मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्यासह दक्षिण मुंबईत भटकंती करणाऱ्या आरक्षण समर्थकांना आंदोलनाचा अधिकार असला तरी त्यांना मुंबई ठप्प करण्याचा, नागरिकांची गैरसोय करण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सोमवारी संताप व्यक्त केला. त्यानंतर, आता मराठा आंदोलकांनी मुंबई सोडण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण मुंबईत ज्या ज्या ठिकाणी मराठा आंदोलक ठाण मांडून बसले होते त्या जागा रिकाम्या झाल्या आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलनाला नवी मुंबईतील खारघरमध्ये परवानगी देण्याची स्पष्ट सूचना न्यायालयाने केली होती. त्यानुसार आता आंदोलकांनी खारघरची वाट धरली आहे.
दुसऱ्या बाजूला पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसबाहेरच्या परिसरात उभ्या असलेल्या मराठा आंदोलकांच्या गाड्या हटवल्या असून या भागातील वाहतूक व्यवस्था आता सुरळीत झाली आहे. तसेच वाशी, ऐरोली व ठाणे येथे नाकेबंदी करण्यात आली असून मराठा आंदोलकांच्या गाड्या शहराच्या बाहेरच रोखल्या जात आहेत. केवळ आंदोलकांना पोहोचवली जाणारी अन्नधान्याची मदत मुंबईत नेण्यास परवानगी देण्यात आली आहे.
