
बुलढाणा• न्युज महाराष्ट्र लाईव्ह
बुलढाणा जिल्हा पोलीस दलातून नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेल्या १७ पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचा भव्य सत्कार व निरोप समारंभ आज, ३१ मे २०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात उत्साहात संपन्न झाला.पोलीस कल्याण शाखा, बुलढाणा यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक निलेश तांबे,अपर पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणीक लोढा, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि प्रभारी सहाय्यक पोलीस अधीक्षक (मुख्यालय) पो.नि. श्री. बी.डी. पावरा यांची प्रमुख उपस्थिती होती.या सोहळ्यात सेवानिवृत्त झालेल्या सर्व १७ पोलीस अधिकारी व अंमलदारांचा त्यांच्या कुटुंबियांसह शाल, श्रीफळ, पुष्पहार, सेवानिवृत्ती प्रमाणपत्र, मोमेंटो, झाडांचे रोपटे, भेटवस्तू आणि साडी देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सेवानिवृत्तांना त्यांच्या भावी सुखी आयुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.या निरोप समारंभाला सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सुमारे १०० हून अधिक नातेवाईक, पोलीस अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता अल्पोपहाराने झाली.
