
न्युज महाराष्ट्र लाईव्ह (प्रतिनीधी)
मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला महत्त्वाचे यश मिळाल्याचा दावा मराठा आंदोलनाचे नेते मनोज (दादा) जरांगे पाटील यांनी केला आहे. शासनाने मराठा समाजाच्या 14 प्रमुख मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याने राज्यभरातील मराठा बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलन, उपोषण आणि जनजागृती मोहिमेमुळे शासनाला विविध मागण्यांवर निर्णय घ्यावा लागल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी हा संघर्ष, त्याग आणि एकजुटीचा विजय असल्याची भावना समाजबांधव व्यक्त करत आहेत.
प्रमुख मागण्या :
▪️ 58 लाख नोंदींची माहिती उपलब्ध करून देणे.
▪️ हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी जातीचे दाखले देणे.
▪️ जात पडताळणी प्रमाणपत्र प्रक्रिया गतीने पूर्ण करणे.
▪️ सातारा गॅझेटची प्रभावी अंमलबजावणी करणे.
▪️ मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करणे.
▪️ आंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक सहाय्य देणे.
▪️ कुणबी प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया गतिमान करणे.
▪️ ग्रामस्तरीय समित्यांच्या कामकाजाचा आढावा घेणे.
▪️ गुन्हे मागे घेऊन चौकशी अहवाल सादर करणे.
▪️ मोडी लिपीचे मराठी भाषांतर करण्यासाठी तज्ज्ञ नेमणे.
▪️ EWS मधून निवड झालेल्या उमेदवारांबाबत निर्णय घेणे.
▪️ न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ देणे.
▪️ सारथी संस्थेच्या कामकाजाबाबत आवश्यक कार्यवाही करणे.
▪️ अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला निधी उपलब्ध करून देणे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या एकजुटीमुळे हे यश शक्य झाल्याचे सांगितले. “एक मराठा, लाख मराठा” या घोषणेच्या बळावर समाजाने एकसंघ राहून लढा दिला आणि त्याचे हे फलित असल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्यभरातील मराठा बांधवांनी या निर्णयांचे स्वागत केले असून शासनाने आता या सर्व मागण्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
“संघर्ष, त्याग आणि एकजुटीच्या बळावर मराठा समाजाचा विजय” असा सूर आंदोलनकर्त्यांमध्ये उमटत आहे.
