
मुंबई•न्युज महाराष्ट्र लाईव्ह / प्रतिनिधी
‘वन बुलढाणा मिशन’चे प्रणेते, शाहू परिवाराचे सर्वेसर्वा संदीप शेळके यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ‘मशाल’सोडून काँग्रेसचा ‘हात’ धरला आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत त्यांनी मुंबईमध्ये पक्षप्रवेश केला आहे. काँग्रेसला बुलढाण्यातून संदीप शेळके यांच्या रूपाने एक मोठा आर्थिक आणि सामाजिक आधार असलेला नेता गळाला लागला आहे.
शेळके यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे उद्धवसेनेला बुलढाणा जिल्ह्यात मोठा राजकीय फटका बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. बुलढाण्यातील या राजकीय भूकंपाने नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. शेळके यांची जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागण्याचे संकेत मिळत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत शेळके हे काँग्रेसचे प्रबळ दावेदार असतील, हे हर्षवर्धन सपकाळ यांच्या भाषणानंतर स्पष्ट झाले आहे.
सपकाळ यांनी “संदीप शेळके हे कष्टाळू कार्यकर्ते असून त्यांनी आता बुलढाणा विधानसभा मतदारसंघ पिंजून काढावा,” असे सांगत ते आमदारकीचे प्रबळ दावेदार असल्याचे प्रत्यक्षपणे सांगितले आहे.
संदीप शेळके उद्धवसेना सोडणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उधाण आले होते. अखेर त्यांनी जिल्हा समन्वयक पदाचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये जाणे पसंत केले आहे. त्यामुळे ते कोणत्या पक्षात जाणार या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
