
मलकापूर•न्युज महाराष्ट्र लाईव्ह / प्रतिनीधी,मो. अहेसान
शहरातील प्रसिद्ध विधिज्ञ व सामाजिक क्षेत्राशी निगडित वरिष्ठ व्यक्तिमत्त्व अॅड. महादेवसिंह चंद्रसिंह रावळ यांचे बुधवार, ११ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता निधन झाले. ते माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक, भाराकाॅचे प्रदेश सचिव अॅड. हरीश रावळ (रा. शास्त्री नगर, मलकापूर) यांचे वडील होते. त्यांच्या निधनाच्या वार्तेने मलकापूर शहरासह परिसरात शोककळा पसरली आहे.
अॅड. महादेवसिंह रावळ यांनी मलकापूर वकील संघाचे माजी अध्यक्ष म्हणून कार्य केले होते. तसेच ते श्री धुपेश्वर संस्थानचे अध्यक्ष पदही भूषवत होते. आपल्या दीर्घ कार्यकाळात त्यांनी विधी क्षेत्रासोबतच सामाजिक व धार्मिक कार्यातही सक्रिय सहभाग नोंदविला. त्यांच्या कार्यामुळे ते शहरात एक आदरणीय व लोकप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्यावर गुरुवार, १२ मार्च रोजी सकाळी १० वाजता माता महाकाली नगर येथील स्व. लक्ष्मण हिरू चव्हाण वैकुंठधाम येथे शासकीय सन्मानात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहर व परिसरातील सामाजिक, राजकीय, व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर, वकील तसेच त्यांचे असंख्य हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या निधनाबद्दल विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी तीव्र शोक व्यक्त केला असून, दिवंगत आत्म्यास शांती लाभो व शोकाकुल कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती लाभो, अशी प्रार्थना व्यक्त करण्यात येत आहे.
