

लोणार•न्युज महाराष्ट्र लाईव्ह (यासीन शेख)
जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या लोणार सरोवरातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सरोवर परिसरातील ऐतिहासिक व धार्मिक स्थळांना धोका निर्माण झाला आहे. सरोवर परिसरातील माता कमळजा देवी मंदिर तसेच पीर बाबा गैबनशाह वली यांची दरगाह सध्या पाण्याखाली गेल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे भाविकांमध्ये तसेच स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
यासंदर्भात लोणार येथील एआयएमआयएमचे युवा तालुका अध्यक्ष शेख जावेद शेख चाँद यांनी तहसीलदारांकडे लेखी निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. सरोवरातील पाण्याची वाढती पातळी कायम राहिल्यास इतिहासकालीन मंदिर आणि दरगाह यांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, कमळजा देवीचे मंदिर सध्या पूर्णपणे पाण्याने वेढले गेले असून भाविकांना दर्शन घेणे शक्य होत नाही. तसेच या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भाविक आणि पर्यटक येत असतात. त्यामुळे या धार्मिक व ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी तातडीने पाणीपातळी कमी करण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत अद्याप पुरातत्व विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. संबंधित विभागांनी संयुक्तपणे लक्ष देऊन मंदिर व दरगाह सुरक्षित ठेवाव्यात आणि भाविकांसाठी ही स्थळे पुन्हा खुली करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या मागणीची प्रत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, पुरातत्व विभाग, वनविभाग तसेच बुलढाणा जिल्हाधिकारी यांनाही पाठविण्यात आली आहे. स्थानिक नागरिक आणि भाविकांचे लक्ष आता प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.
