
छत्रपति संभाजीनगर/औरंगाबाद ,
(न्युज महाराष्ट्र लाईव्ह )मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयए न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली असून संशयावरून दोषी ठरवणे योग्य नाही, असे न्यायालयाने म्हटलं आहे. या निकालावर प्रतिक्रिया देताना इम्तियाज जलील यांनी तत्कालीन सरकार आणि साध्वी प्रज्ञासिंह यांना तिकीट देणाऱ्या भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएच्या विशेष न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल सुनावत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. केवळ संशयामुळे आरोपींना दोषी धरता येणार नाही, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. तब्बल 17 वर्षांनंतर आलेल्या या निकालानंतर दोन्ही बाजूने विविध प्रतिक्रिया उमटत असून एमआयएम नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी तत्कालीन राज्य सरकारसह या प्रकरणातील आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह यांना निवडणुकीत तिकीट देणाऱ्या भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “एका समाजात दहशत निर्माण करण्यासाठी आणि समाजात धार्मिक दुफळी निर्माण करण्यासाठी मालेगावमध्ये बॉम्बस्फोट करण्यात आला होता. सगळेच निर्दोष असतील तर मग बॉम्बस्फोट कोणी घडवून आणला?” असा खरपूस सवाल जलील यांनी उपस्थित केला आहे.
