
बुलढाणा,(न्युज महाराष्ट्र लाईव्ह): –
बुलढाणा शहर आणि परिसरातील १५ गावांसाठी एक शुभवार्ता आली आहे. दमदार पावसामुळे शहरासह १५ गावांना पाणीपुरवठा करणारे येळगाव धरण (स्व. भोंडे जलाशय) १०० टक्के भरले आहे.यामुळे धरणाची पाच स्वयंचलित दारे उघडण्यात आली. यामुळे जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहर आणि परिसरातील १५ गावांचा वर्षभराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. धरणाला स्वयंचलित ८० गोडबोले द्वारे आहेत. त्यापैकी जलाशयाची ५ द्वारे उघडली आहे. याद्वारे ४०.५५ घनमीटर प्रतिसेकंदने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
बुलढाणा चिखली राज्यमार्गावर असलेल्या येळगाव धरणावरून शहर व परिसरातील १५ गावांना नगरपालिकेद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. शहरी भागात नगरपालिकेद्वारे काही भागात जुनी पाइपलाइन, तर काही भागात ‘थ्री व्हॉल्व्ह सिस्टीम’द्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यासाठी शहर परिसरातील येळगाव धरणातून जलशुद्धीकरण केंद्र व या केंद्रातून शहरातील जलकुंभात पाणी येते. त्यातून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो.
