
बुलढाणा (न्यूज महाराष्ट्र लाईव्ह)प्रतिनिधी
सोमवार ११ ऑगस्ट २०२५ रोजी यशोवर्धन हर्षवर्धन सापकाळ आणि सर्व गावकऱ्यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद CO कार्यालय येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. भींगारा, चालिस्तापरी आणि गोमाळ या गावांतील शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी हे आंदोलन झाले. अनेक वेळा लेखी व तोंडी मागण्या करूनही कारवाई न झाल्याने गावकऱ्यांनी थेट आंदोलनाचा मार्ग अवलंबला.
या आंदोलनात भींगारा शाळेत ९वी-१०वीसाठी दोन वर्षांपासून शिक्षक नसल्याने तातडीने शिक्षक नेमणुकीची मागणी करण्यात आली. चालिस्तापरी येथील शाळा बांधकामाचा टेंडर मिळाल्यानंतरही ठेकेदाराने काम न करता पळ काढल्यामुळे त्याच्यावर कारवाई करून नवीन आणि विश्वासू ठेकेदाराला टेंडर देण्याची मागणी करण्यात आली. तसेच गोमाळ शाळेला पक्की इमारत उभी करावी आणि ड्युटीवर दारू पिणाऱ्या शिक्षकाला तातडीने हटवून योग्य शिक्षक नेमावा, अशीही मागणी करण्यात आली.
आंदोलनादरम्यान अधिकाऱ्यांनी सर्व मागण्यांचा विचार करून लवकरात लवकर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. गावकऱ्यांनी मात्र मागण्यांची पूर्तता होईपर्यंत लक्ष ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
