
लोणार• न्युज महाराष्ट्र लाईव्ह/प्रतिनिधि
अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटना (AIOCD) यांच्या देशव्यापी आवाहनानुसार बुधवार दि. २० मे २०२६ रोजी पुकारण्यात आलेल्या “अखिल भारतीय औषधी विक्रेता बंद” संदर्भात लोणार तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आज लोणारचे तहसीलदार साहेब तसेच पोलीस स्टेशनचे ठाणेदार साहेब यांना निवेदन सादर केले.
या निवेदनामध्ये ऑनलाईन औषध विक्री, ई-पोर्टल प्रणाली तसेच इंटरनेट फार्मसीमुळे स्थानिक औषध विक्रेत्यांवर होत असलेल्या परिणामांविषयी संघटनेने आपली भूमिका मांडली. तसेच केंद्र शासनाकडे यापूर्वी अनेक वेळा निवेदने देऊनही सकारात्मक निर्णय न झाल्याने देशभरातील औषध विक्रेत्यांनी २० मे रोजी बंद आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.
महाराष्ट्रासह बुलढाणा जिल्ह्यातील व लोणार तालुक्यातील सर्व औषध विक्रेते या आंदोलनात सहभागी होणार असून, आवश्यक सेवांबाबत नागरिकांना अडचण येऊ नये यासाठी प्रशासनाशी समन्वय ठेवून सहकार्य करण्यात येणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
यावेळी तालुका संघटनेचे अध्यक्ष, सचिव व इतर पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासनानेही निवेदन स्वीकारून योग्य त्या स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
