
बुलढाणा >न्युज महाराष्ट्र लाईव्ह:-
बुलढाणा : जिल्ह्यातील हजारो नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्याच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा करा अथवा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांसह घुसण्याचा रोखठोक ईशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटा) ने दोन दिवसापूर्वीच दिला होता. त्याप्रमाणे गनिमी काव्याचा वापर करीत आक्रमक झालेल्या ठाकरे सेनेने जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घुसण्याचा प्रयत्न केला.
काही शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयच्या मुख्य प्रवेश द्वारावर चढून आत उडी मारण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी व जलद कृती दलाने त्यांना आत जाण्यापासून रोखले. यावेळी घटना स्थळी तणावाचे वातावरण तयार झाले. शिवसैनिकांच्या गगनभेदी घोषणानी वातावरण आणखी तापले. मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सामोपचाराची भूमिका घेत शिष्ट मंडळाला पालकमंत्री मकरंद पाटील यांची भेट घेण्याची तयारी दर्शविली. यामुळे ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी संयमी भूमिका घेत पोलिसांची शिष्टाई व मागणी मान्य केली.यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील तणावं निवळला.
