जीर्ण शाळेची खोली तत्काळ पाडण्याची मागणी

(न्युज महाराष्ट्र लाईव्ह) प्रतिनिधी,यासीन शेख
लोणार तालुक्यातील हिरडव येथील जिल्हा परिषद शाळेची स्थापना १९०८ साली झाली त्या काळात बांधलेल्या शाळेच्या काही खोल्या जीर्ण झाल्या आज शेवटच्या घटका मोजत आहेत. त्या जीर्ण खोल्या तत्काळ पाडण्यात याव्यात अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडून जीवित हानी होऊ शकते. अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीने केली आहे.
या पडायला झालेल्या शाळा खोलीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवितवास धोका निर्माण होऊ नये म्हणून खोली पाडण्याचा निष्कासनाचा प्रस्ताव प्रशासनाकडे देण्यात आला आहे. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही प्रक्रिया रखडली आहे. शाळा व्यवस्थापन समितीने वारंवार पाठपुरावा करूनही कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. सदर पडक्या खोलीच्या शेजारी इयत्ता १ लीच्या वर्ग भरतो. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे खोली कधीही पडू शकते. त्यामुळे मुलांच्या जिवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. गावकरी व शाळा व्यवस्थापन समिती यांची ठाम मागणी आहे की सदर खोली तातडीने पाडावी. परंतु प्रशासन याबाबत गंभीर नाही, असा आरोप शाळा व्यवस्थापन समितीने केला आहे. कुठलीही जीवितहानी झाल्यास त्यास संबंधित अधिकारी व प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा गावकरी व शाळा व्यवस्थापन समितीने दिला आहे. तसेच, जर तातडीने कारवाई झाली नाही तर शाळेतील मुले घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
