
लोणार (न्यूज महाराष्ट्र लाईव्ह) प्रतिनिधी,राहुल सरदार
दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास रायगाव येथील मुकुंद थोरवे वय वर्ष 25 झोपेत कुस बदलत असताना त्यांचा हात शेजारून जात असलेल्या नाग जातीच्या विषारी सापावर पडला असता नागाने त्यांना कडकडून चावा घेतला व शेजारी ठेवलेल्या बॅग मागे जाऊन लपला, मुकुंद यांचे बंधू संतोष थोरवे यांनी तत्काळ याची माहिती सर्पमित्र विनय कुलकर्णी यांना दिली, त्यावेळेस विनय कुलकर्णी पहाटे साडे तीन पासून टिटवी या गावात संतोष तनपुरे यांच्या घरी निघालेल्या नागाचा शोध घेत होते, तेथील नाग सापाला रेस्क्यु करून पुढील दहा मिनिटांतच रायगाव गाठले, तेथे साडे चार फूट लांबीचा नाग आढळून आला ज्याने मुकुंद यांचा चावा घेतला होता, त्याला रेस्क्यु करून विनय कुलकर्णी यांनी तत्काळ ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर उमेश साळवे यांना संपर्क साधून सर्प दंश झालेल्या रुग्णाला घेऊन येत असल्याचे कळविले विष प्रतिरोधक औषधाची तयारी करून ठेवायला सांगितले, आणि पुढील वीस मिनिटांतच रुग्णाला घेऊन ग्रामीण रुग्णालय लोणार येथे दाखल केले, त्यानंतर डॉ. समाधान ढाकणे व डॉ उमेश साळवे यांनी रुग्णावर उपचार सुरू केले विष प्रतिरोधक लस लावून पुढील अद्ययावत उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात रेफर केले. यात स्टाफ उर्मिला वीर, अनिता खरे, निलेश वाघ आणि किसन टेकाळे यांनी मोलाचे सहकार्य केले. सद्य स्थितीत रुग्णांची तब्येत सुधारत असून धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली, मुख्यतः सर्पमित्र विनय कुलकर्णी यांनी केलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
पावसाळ्याच्या दिवसात सापांचे घरात शिरण्याचे तसेच सर्प दंशाचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढते, कारण याच काळात सापांचे पिल्ले सुद्धा अंड्यातून बाहेर पडतात, आणि पाऊस चालू झाल्यावर साप कोरड्या जागेच्या शोधात किंवा भक्षाच्या शोधात घरात येतात, असे साप घरात न येण्यासाठी दरवाजांना कुठेही फट, सांद नाही राहिली पाहिजे याची काळजी घेणे गरजेचे आहे, तसेच जमिनीवर झोपताना मच्छरदाणी लावून झोपावे, अंधारात बाहेर जाताना हातात बॅटरी घेऊन जावे,शेतात जाताना पायात गम बूट घालून जावे असे आवाहन सर्पमित्र तसेच निसर्ग मल्टीपर्पज फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष विनय कुलकर्णी यांनी केले.
