
बुलढाणा• न्युज महाराष्ट्र लाईव्ह / प्रतिनीधी
उबाठा शिवसेनेच्या महिला उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ यांना मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीवरून चिखला गावात तीव्र वाद उफाळून आला असून, या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आहे. गावातील महिलांमध्ये प्रचंड हाणामारी झाली. या घटनेत उबाठा शिवसेनेच्या महिला उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ यांना मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या एक दिवस आधी गावातील एका खुल्या जागेवर अज्ञात व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला होता. मात्र, ही जागा गावातील विविध सामाजिक व कौटुंबिक कार्यक्रमांसाठी विशेषतः लग्नसमारंभासाठी वापरली जात असल्याने, पुतळा ग्रामपंचायतीच्या जागेत उभारावा, अशी मागणी ग्रामस्थांच्या एका गटाने केली होती. याबाबत ग्रामपंचायतीकडे निवेदन देण्यात आले होते. तरीही पुतळा हलवण्यात न आल्याने वाद चिघळला.
