डॉक्टर अभिलाष माळी यांचे सर्व स्तरावरून होतंय कौतुक…

बुलढाणा:-(न्यूज महाराष्ट्र लाईव्ह/अलीम खान)
बुलढाणा शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर अभिलाष माळी यांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या यशस्वी शस्त्रक्रियांबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. डॉक्टरांच्या प्रसंगावधानामुळे आणि कौशल्यामुळे दोन बालकांचे प्राण वाचले आहेत. यामध्ये तीन वर्षीय बालकाने पाच रुपयाची नाणी गिळली तर आठ वर्षीय मुलीने घड्याळाची बॅटरी सेल गिळला.
या दोन्ही मुलांनी खेळता-खेळता नाणी आणि बॅटरी गिळली होती, ज्यामुळे त्यांच्या जीवावर बेतले असते, परंतु डॉक्टरांनी एंडोस्कोपीद्वारे ती सुरक्षितपणे बाहेर काढली.
पहिल्या घटनेत, एका तीन वर्षांच्या मुलाने खेळता-खेळता चुकून नाणे गिळले. पालकांनी त्वरित त्याला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तातडीने तपासणी केली आणि एंडोस्कोपीद्वारे नाणे यशस्वीरित्या बाहेर काढले. यामुळे मुलाला मोठा दिलासा मिळाला आणि त्याचा जीव वाचला.
दुसऱ्या घटनेत, एका ८ वर्षाच्या मुलीने खेळताना सेल (बॅटरी) गिळला. बॅटरी गिळल्याने शरीरात रसायनांची गळती होऊन गंभीर हानी पोहोचू शकते, हे लक्षात घेता डॉक्टरांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले. त्यांनी तत्काळ एंडोस्कोपी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. अत्यंत काळजीपूर्वक ही शस्त्रक्रिया पार पडली आणि बॅटरी सुरक्षितपणे बाहेर काढले.
गिळलेली बॅटरी ही धोकादायक व गंभीर स्वरूपाची इजा आतड्याला व पोटाला करू शकतात जी एका विशिष्ट वेळ आधी काढणे गरजेचे असते आणि त्यात डॉक्टर अभिलाष माळी यांना यश आले. या घटनेत मुलींची नातेवाईक छत्रपती संभाजी नगरला जायला निघाले होते पण वेळेच्या कमतरतेमुळे बुलढाणा कडे त्यांनी धाव घेतली व डॉक्टर अभिलाष माळी यांनी तत्परतेने उपचार करून बालेकिचे प्राण वाचवले.
या दोन्ही घटनांमध्ये, वेळेवर मिळालेले वैद्यकीय उपचार आणि डॉक्टरांनी दाखवलेले कौशल्य यामुळे दोन्ही बालकांचे प्राण वाचले. अशा प्रकारच्या घटनांमध्ये पालकांनी त्वरित वैद्यकीय मदत घेणे किती महत्त्वाचे आहे, हे यातून पुन्हा एकदा अधोरेखित होते. यावेळी डॉक्टर अभिलाष माळी यांच्या या यशस्वी शस्त्रक्रियेची सर्वत्र चर्चा सुरू आहे आणि त्यांचे सर्व ठिकाणाहून कौतुक करण्यात येत आहे. डॉक्टर अभिलाष माळी यांनी बालकांच्या पालकांना अशा वस्तू मुलांच्या आवाक्याबाहेर ठेवण्याचे आणि त्यांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
