
बुलढाणा : न्युज महाराष्ट्र लाईव्ह
शहरातील जयस्वाल चौक परिसरात झालेल्या चाकू हल्ल्यात सागर उर्फ पप्पू जाधव (वय ३८) यांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे. सोनू जाधव (रा. भीलवाडा) आणि त्याचा सहकारी आनंद काकफळे अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत.
घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरात मिरवणूक काढण्यात आली होती. सागर जाधव हेही या मिरवणुकीत सहभागी झाले होते.
मिरवणूक संपल्यानंतर ते रात्री उशिरा घरी परतत असताना जयस्वाल चौकात त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. पाठीवर गंभीर वार झाल्याने ते रक्तबंबाळ अवस्थेत कोसळले. नागरिकांनी तत्काळ त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
प्राथमिक तपासात वैयक्तिक संबंधातून निर्माण झालेल्या तणावामुळे हा हल्ला घडल्याचे समोर आले आहे. संबंधित महिलेशी असलेल्या निकट संबंधांमुळे दोन्ही बाजूंमध्ये वाद वाढला होता. त्यातूनच वैमनस्य निर्माण होऊन आरोपीने हल्ला केल्याची शक्यता तपासात व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणाचा तपास गतीने करत पोलिसांनी संशयितांचा मार्ग काढत दोघांना अटक केली. पुढील तपास सुरू असून, गुन्ह्याच्या सर्व पैलूंवर चौकशी केली जात आहे. दरम्यान आरोपीस शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.
