
बुलढाणा:-(न्यूज महाराष्ट्र लाईव्ह) प्रतिनिधी, अलीम खान,सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि या दिवसांमध्ये आपल्या शेतात आणि घराच्या आसपास अनेक प्रकारचे साप बाहेर पडताना दिसतात. पाणी आणि गवताची वाढ यामुळे सापांना लपण्यासाठी आणि फिरण्यासाठी अनुकूल वातावरण मिळते, ज्यामुळे त्यांचा वावर वाढतो.
आपण सर्वजण आपल्या शेतात आणि बांधावर सतत काम करत असतो, त्यामुळे सापांशी अचानक सामना होण्याची शक्यता असते. सापांच्या चावण्याने गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, अगदी जीवावरही बेतू शकते.यासाठी, पावसाळ्यात आपण सर्वांनी खालील खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. असाच एक प्रकार बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट या गावात घडला आहे.दि 22 जुलै रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास देऊळघाट येथील ग्रामपंचायत माजी तंटामुक्ती अध्यक्ष जुनेद खान दत्तपुर शिवारात असलेल्या शेतात जनावरांसाठी गोठ्यात फॅन लावण्याकरिता गेले होते. फॅन फिट करत असताना त्यांच्या पायाला मन्यार जातीच्या विषारी सापाने वेढा घेतला आणि पायाला दोन ते तीन डंक मारले. सुरुवातीला त्यांना मुंग्या आल्यासारखं वाटले मात्र त्यांनी पायाकडे लक्ष दिले असता त्यांना साप दिसून आला. त्यांनी खबरदारी म्हणून आपल्या पायाला झटका दिला त्यामध्ये तो साप निघून गेला मात्र त्यांना त्या ठिकाणी चक्कर आली. सोबत असलेल्या नातेवाईकांनी त्यांना घटनास्थळावरून ताबडतोब जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये उपचारासाठी दाखल केले. वाटत रस्त्यात त्यांना परत दोन साप दिसून आले. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे. सध्या त्यांची परिस्थिती धोक्याबाहेर आहे असे डॉक्टर यांनी सांगितले. त्यामुळे अशा घटनांकडे गांभीरतेने लक्ष देऊन शेतकरी बांधवांनो तुम्ही सुद्धा खबरदारी घ्यावी. असे आव्हान न्यूज महाराष्ट्र लाईव्ह परिवाराच्यावतीने करण्यात येत आहे.
शेतकरी बांधवांनो आपण काय घेतली पाहिजे खबरदारी
संरक्षक पादत्राणे वापरा: शेतात काम करताना नेहमी लांब बूट किंवा गमबूट वापरा. यामुळे सापांपासून पायांचे संरक्षण होईल.
दक्ष रहा: चालताना किंवा काम करताना आजूबाजूला आणि विशेषतः गवतात, झुडपांमध्ये लक्षपूर्वक पाहून चाला.
परिसर स्वच्छ ठेवा: शेतातील बांध, कडूस, तसेच घराच्या आसपासची जागा स्वच्छ ठेवा. अनावश्यक गवत, लाकडांचे ढिगारे, किंवा इतर कचरा काढून टाका, कारण यात साप लपून बसू शकतात.
रात्री विशेष काळजी घ्या: रात्रीच्या वेळी बाहेर पडताना टॉर्चचा वापर करा. अंधारात साप दिसणे कठीण होते.
साप दिसल्यास काय करावे: जर तुम्हाला साप दिसलाच, तर त्याला डिवचण्याचा प्रयत्न करू नका. त्याला शांतपणे निघून जाऊ द्या. शक्य असल्यास, सर्पमित्राला किंवा वन विभागाला माहिती द्या.
*साप चावल्यास काय करावे:*
दुर्दैवाने साप चावल्यास, वेळ न घालवता तात्काळ जवळच्या रुग्णालयात जा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार घ्या. अंधश्रद्धा किंवा घरगुती उपचारांवर विश्वास ठेवू नका.
आपल्या कुटुंबाची आणि स्वतःची सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची आहे. थोडीशी खबरदारी आपल्याला मोठ्या संकटातून वाचवू शकते.
