
बुलढाणा : न्युज महाराष्ट्र लाईव्ह/प्रतिनीधी
येथील देव्हारी व सातगाव परिसरातील दोन गंभीर अपघातग्रस्त बालकांचे प्राण वाचवण्यात विद्याविश्व हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी मोठे यश मिळवले आहे. अवघ्या सात दिवसांच्या कालावधीत झालेल्या या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तातडीने शस्त्रक्रिया करून बालकांना नवजीवन देण्यात आले.
पहिली घटना देव्हारी येथील १० वर्षीय बालकाशी संबंधित आहे. या बालकाच्या पोटावरून वाहन गेल्याने त्याच्या प्लीहेला गंभीर इजा झाली होती. मोठ्या प्रमाणात, सुमारे १.५ लीटर रक्तस्त्राव झाल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर होती. अशा वेळी तात्काळ शस्त्रक्रिया करून आणि आवश्यक रक्तपुरवठा करून डॉक्टरांनी या बालकाचे प्राण वाचवले.

दुसरी घटना सातगाव येथील ८ वर्षीय बालकाची आहे. ट्रॅक्टरच्या धडकेत त्याच्या लिव्हरला मार लागून अंतर्गत रक्तस्त्राव सुरू झाला होता. या बालकावरही तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली आणि रक्तस्राव थांबवून त्याचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. या दोन्ही शस्त्रक्रिया विद्याविश्व हॉस्पिटलचे संचालक डॉ. अभिलाष माळी यांच्या नेतृत्वाखाली पार पडल्या. तसेच एनेस्थेटिस्ट म्हणून डॉ. माधुरी गडाख, डॉ. लविश गायकवाड आणि डॉ. तायडे यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.
