“सर्वधर्मीय हिंदू बांधवांची मोठी उपस्थिती; व्याख्यानातून मानवतेचा व बंधुभावाचा संदेश”


लोणार •न्युज महाराष्ट्र लाईव्ह/प्रतिनीधी
दिनांक ६ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी ६.०० ते ८.०० वाजे दरम्यान मुहम्मदी मस्जिद लोणार येथे पवित्र रमजान महिन्यानिमित्त जमियत ए उलमाए हिंद लोणार द्वारे आयोजित ‘रमजान परिचय व इफ्तार कार्यक्रम’ उत्साहपूर्ण व बंधुभावाच्या वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास लोणार शहरातील सर्वधर्मीय समाजसेवक, राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, व्यावसायिक, शिक्षक, प्राध्यापक, वकील, डॉक्टर, विद्यार्थी आदी विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी एकत्रितपणे इफ्तारचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर सर्व उपस्थितांसमोर नमाज पठण करण्यात आले, ज्याचे प्रत्यक्ष दर्शन अनेकांनी प्रथमच अनुभवले. यामुळे इस्लाम धर्मातील उपासना पद्धती व त्यामागील आध्यात्मिक संदेश समजून घेण्याची संधी उपस्थितांना मिळाली.
यानंतर संत साहित्याचे अभ्यासक प्रा. सय्यद सलमान (पुसद) यांनी प्रभावी व्याख्यानातून भगवद्गीता तसेच विविध धर्मग्रंथांचा सार सांगत सर्व धर्मांतील मानवतेचा समान संदेश स्पष्ट केला. त्यांनी मराठी भाषेतून पैगंबर मोहम्मद यांच्या जीवनातील मूल्ये व मानवतेचा संदेश उपस्थितांपर्यंत पोहोचवला. त्यांच्या विचारांनी श्रोते प्रभावित झाले.
कार्यक्रमादरम्यान मस्जिदचा परिचय करून देण्यात आला तसेच मस्जिदमधून समाज व देशहितासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांची माहितीही देण्यात आली. उपस्थित समाजबांधवांना मराठी भाषेतील कुरआनचे भाषांतर तसेच इतर इस्लामिक ग्रंथ भेट स्वरूपात प्रदान करण्यात आले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. बळीराम मापारी यांनी आपल्या अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तसेच प्रा. गजानन खरात यांच्यासह इतर उपस्थित मान्यवरांनीही आपले सकारात्मक विचार मांडले. अशा प्रकारचे सर्वधर्मीय संवाद वाढवणारे कार्यक्रम सातत्याने आयोजित होणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
जमियतचे तालुकाध्यक्ष एड. हाजी रिजवान जड्डा यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे यशस्वीते करिता सर्व मुस्लिम बांधवांनी परिश्रम घेतले.
