
देऊळघाट, न्युज महाराष्ट्र लाईव्ह/प्रतिनिधी
स्थानिक पी.एम.श्री. जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय देऊळघाट येथील विद्यार्थी कार्तिक अंकुश बोराडे याचा तालुका क्रीडा संकुल धाड नाका बुलढाणा येथे झालेल्या जिल्हास्तरीय आर्चरी क्रीडा प्रकारामध्ये प्रथम क्रमांक आला असून त्याची विभाग स्तरावर निवड झालेली आहे.
आज संस्थेचे प्राचार्य व सर्व शिक्षक, शिक्षिका यांच्यातर्फे वर्ग 9 वी चा कार्तिक बोराडे याने ग्रामीण भागातील विद्यार्थी असताना सुद्धा आर्चरी या क्रीडा प्रकारांमध्ये दैदीप्यमान यश संपादन केल्या प्रित्यर्थ त्याचे आणि त्याचे वडील अंकुश बोराडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सत्काराच्या वेळी आदरणीय प्राचार्य आर.आर.सय्यद सर यांनी इतर मुलांनी सुद्धा कार्तिक बोराडे या विद्यार्थ्यासारखे विविध क्रीडा प्रकारांमध्ये तसेच इतर प्रकारांमध्ये स्वतःला सिद्ध करावे यासाठी आवाहन केले आणि प्रेरणापर मार्गदर्शन केले. कोणताही विद्यार्थी आपल्या मेहनतीच्या आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे व प्रबळ इच्छाशक्ती च्या जोरावर कोणत्याही क्रीडा प्रकारामध्ये उत्तुंग यश प्राप्त करू शकतो यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. आर्चरी क्रीडा प्रकार हा भारतातील सर्वात जुना क्रीडा प्रकार असुन यामध्ये भारताचा जागतिक स्तरावर दबदबा असल्याचे प्राचार्य यांनी प्रतिपादन केले.
जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय देऊळघाट येथील अनेक विद्यार्थी येथील क्रीडा शिक्षक आणि क्रीडाविषयक मार्गदर्शन करणारे शिक्षक वृंद यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी विविध क्रीडा प्रकारात राज्यस्तरापर्यंत जात असतात. या विद्यार्थ्यास शाळेतील क्रीडा शिक्षक आणि कोच ईलग सर यांचे मार्गदर्शन मिळाले. प्राचार्य आर आर सय्यद आणि शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्तिकला पुढे राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरापर्यंत जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्याचा व त्याच्या वडिलांचा उत्साह वाढवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील क्रीडा शिक्षक श्री एस एल राजपूत यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री हमीद खान सर यांनी केले.
