

न्युज महाराष्ट्र लाईव्ह/प्रतिनिधी,
बुलढाणा : बुलढाणा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेले ऐतिहासिक वारसा लाभलेलं देऊळघाट गाव आजही विकासापासून कोसो दूर असल्याचे चित्र आहे. स्वातंत्र्याला ७९ वर्षे पूर्ण होऊनही गावात आजतागायत मुलभूत सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झालेल्या नाहीत. मुस्लिम बहुल असलेल्या या गावाचा वापर केवळ व्होट बैंक म्हणूनच झाला असून विकास मात्र कागदावरच अडकून पडला आहे. येथील राजकारणाच्या दबावापोटी नियम डावलून विकास कामे (भ्रष्टाचार) करणारे अनेक ग्रामसेवक अडचणीत आले आहे तर काहीवर निलंबनाची देखील कारवाई झालेली आहे, हे विशेष.
दर शुक्रवारी देऊळघाटमध्ये मोठा बाजार भरतो. मात्र बाजार भरतो ते ठिकाण अस्वच्छतेच्या विळख्यात सापडले असून,घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. गावात एकाही ठिकाणी सार्वजनिक मुत्रीघर नाही त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. येथे बारावीपर्यंत शिक्षणाची सोय असली तरी जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींची अवस्था दयनीय आहे. काही शिक्षक शिक्षणाकडे दुर्लक्ष करून खरेदी-विक्री व कमिशनच्या व्यवसायात थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे.
या जिल्हा परिषद सर्कलमधून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा राजकीय उदय झाला. जिल्हा परिषद अध्यक्ष ते आमदार असा प्रवास करूनही देऊळघाटचा पाण्याचा प्रश्न सुटू शकला नाही.
येळगाव येथून पाणीआणण्याचा प्रयत्न करून काही ठिकाणी नळ बसविण्यात आले, मात्र शाश्वत तोडगा निघाला नाही. तीन वेळा आमदार राहिलेले विजयराज शिंदे यांनाही हा प्रश्न सोडवता आला नाही. सध्या दुसऱ्यांदा आमदार झालेले आ. संजय गायकवाड यांनी तरी या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.
गावातील ‘विरोधासाठी विरोध’ या राजकारणामुळे सामान्य जनतेचा नाहक बळी जात असल्याचा आरोप होत आहे. दर जिल्हा परिषद निवडणुकीत देऊळघाटच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे जाहीरनामे नागरिकांना पाठ झाले आहेत. त्यामुळे आता देऊळघाट वासीयांना फसवे जाहीरनामे नको असून, प्रत्यक्षात पाण्याचा प्रश्न सोडविणाऱ्या नेतृत्वाचीच गरज गरज आहे.
