
बुलढाणा > न्युज महाराष्ट्र लाईव्ह:-
स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय देऊळघाट येथे दिनांक 28 सप्टेंबर 2025 हा आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य आर. आर. सय्यद हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे जन माहिती अधिकारी तथा उच्च श्रेणी सहाय्यक शिक्षक श्री हमीद खान अयुब खान आणि शाळेचे प्रभारी पर्यवेक्षक श्री एस एल राजपूत हे होते. माहिती अधिकार कायदा 2005 चा प्रचार आणि प्रसार होऊन नागरिकांना या कायद्याचे ज्ञान व्हावे, समाजात या कायद्याप्रती जाणीव जागृती निर्माण व्हावी या हेतूने दिनांक 28 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करणे बाबत वरिष्ठ कार्यालयाकडून निर्देश आहेत. याप्रसंगी शाळेचे जन माहिती अधिकारी तथा उच्च श्रेणीचा एक शिक्षक श्री हमीद खान अयुब खान आणि ज्येष्ठ शिक्षिका सय्यद राना तबस्सुम यांनी विद्यार्थ्यांना माहिती अधिकार अधिनियम 2005 चा इतिहास आणि या कायद्याचे महत्त्व, तसेच भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 19 (1) (क) मध्ये भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य सोबतच माहिती अधिकार समाविष्ट असल्याबाबत व हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याबाबत आपल्या भाषणातून माहिती दिली तर शाळेचे प्राचार्य तथा प्रथम अपिलीय अधिकारी श्री आर. आर. सय्यद यांनी त्यांच्या भाषणातून माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील तरतुदींचा वापर करून विहित नमुन्यातील जोडपत्रे सादर करून माहिती मिळविण्याची कार्यपद्धती, शुल्क, माहिती पुरविण्याबाबत अपवाद याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. माहिती अधिकार कायदा हा आपल्या लोकशाहीचा आधारस्तंभ असून हा कायदा नागरिकांना सरकारी कार्यालयाकडून माहिती मिळविण्याचा हक्क देतो ज्यामुळे प्रशासनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढते तसेच या कायद्यामुळे सरकारी कामकाजात प्रचंड पारदर्शकता, सरकार अधिक उत्तरदायी बनतात, भ्रष्टाचाराला आळा बसतो आणि लोकशाहीचे सक्षमीकरण होते असे मा. प्राचार्य आर आर सय्यद यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून प्रतिपादन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर फिरोज खान उच्च श्रेणी सहाय्यक शिक्षक यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री पी पी सपकाळ विषय शिक्षक यांनी केले.
